HOME   टॉप स्टोरी

शेतकर्‍यांनी आता महावितरणच्या कर्मचार्‍यांना विष पाजावे, आपण घेऊ नये!

राजकुमार सस्तापुरे आणि कार्यकर्त्यांचे आवाहन, एकंबीच्या शेतकर्‍याची प्रकृती अजूनही चिंताजनक


लातूर: महावितरणच्या ५९ हजाराच्या बिलापायी हतबल झालेल्या एकंबीच्या श्हाजी राठोड या अल्पभूधारक शेतकर्‍याने महावितरणच्या कार्यालयात विषारी औषध घेतले होते. लातुरच्या आशिर्वाद रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आजही त्याच्या तब्येतीत सुधारणा झालेली नाही, चिंताजनकच आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रुग्णालयात जाऊन त्याची अवस्था पाहिली, डॉक्टरांशी चर्चा केली. राठोड यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही पण ती जैसे थे आहे असे डॉक्टरांनी सांगितले.
महावितरणने हे वीज बील कमी करावे किंवा त्याचे हप्ते पाडून द्यावेत आणि पुन्हा वीज जोडणी द्यावी यासाठी शहाजी यांनी औसा आणि उजनी येथील महावितरणच्या कार्यालयात अनेकदा चकरा मारल्या पण त्याला यश आले नव्हते. काल सकाळी उजनी येथील महावितरणच्या कार्यालयात आणखी एकदा विनंती केली. पण कुणीच ऐकलं नाही. अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या समोर त्यांनी सोबत आणलेले रोगर नावाचे किटकनाशक प्राशन केले होते.
आज सस्तापुरे यांनी हे सबंध प्रकरण जाणून घेतले. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करतात. आता महावितरणमुळे ते आत्महत्येचा प्रयत्न करीत आहेत. सरकारने शेतकर्‍यांची बाजू समजून नाही घेतली तर याचा उद्रेक होईल. शेतकर्‍यांनी असा टोकाचा निर्णय घेऊ नये. महावितरणचे अधिकारी-कर्मचारी वीज पुरवठा तोडत असतील तर आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांना धडा शिकवू, विष घेण्याची वेळ आली तर त्या अधिकारी-कर्मचार्‍याला विष पाजावे. मरण्यासाठी नाही तर लढण्यासाठी तयार रहावे असे आवाहन राजकुमार सस्तापुरे यांनी केले.


Comments

Top