HOME   टॉप स्टोरी

या ट्राफीक कॉन्स्टेबलला एकदा भेटायलाच हवे

हनुमान चौकात उत्तम रहदारी नियोजन, चुकलेला कुणीही असो त्याला दंड होतोच!


लातूर: छोटं शहर, छोटे रस्ते, चौकांची संख्या अधिक, वाहनांची संख्या प्रचंड, माणसांचीही प्रचंड! यामुळे वाहतुकीचे-रहदारीचे तीन तेरा वाजणारच. अलीकडे मनपाने शहरातील बहुतांश महत्वाच्या चौकातून सिग्नल यंत्रणा बसवल्या, कुठे चालू तर कुठे बंद हा लपंडाव सुरुच असतो. नव्याने सुरु झालेल्या सिग्नल यंत्रणा दयानंद गेट आणि हनुमान चौक या दोन ठिकाणी अतिशय उत्तम रितीने सुरु आहेत. नुसती सिग्नल यंत्रणा चांगली असून भागत नाही तर तिथं असणारा वाहतूक शाखेचा पोलिसही सक्षम असला पाहिजे. हे भाग्य हनुमान चौकाला लाभले आहे. या चौकाची जबाबदारी तात्याराव गुंडीले या वाहतूक हवालदाराकडे आहे. या चौकात सिग्नल सुरु झाल्यापासून इथली व्यवस्था ते पाहतात. जराही चूक झाली तर जागेवर दंडाची पावती फाडतात. वरच्या साहेबांची ओळख संगितली तर दंडाची पावती तातडीने फाडून हातात ठेवतात, पैसे घेतात आणि साहेब ओळखीचे आहेत ना? त्यांच्याकडून घ्या पैसे असे सांगून मोकळे होतात. त्यांच्या कडव्या शिस्तीची, कर्तव्य तत्परतेची माहिती या भागातून जाणार्‍या सर्वांनाच झाल्याने हनुमान चौकात आपोआपच लोक नियमाने वागतात. आजवर किती लोकांनी तुम्हाला त्रास दिला, एखादं उदाहरण सांगा असं म्हणाल्यावर, असतात काही असे लोक चालत राहतं, पण थोडीफार यंत्रणा आणि सुविधा दिल्यास लातुरचे लोक शिस्तीत वागतात असा विश्वास गुंडीले यांनी व्यक्त केला. हनुमान चौकात सिग्नल यंत्रणा बसवल्यापासून रहदारीला शिस्त लागली आहे. या भागातील दुकानदार आणि व्यापारीही त्यांच्या कामावर खूश आहेत. या बातमीसाठी चित्रण सुरु असताना दोन युवक रॉंग साईडने घुसले, एका मोटारसायकलला तर नंबरच नव्हता या दोघांनाही पकडून गुंडीले यांनी दंड केला.


Comments

Top