HOME   टॉप स्टोरी

महापौर सुरेश पवार सिंगापूरला, कुणालाच पत्ता नाही!

दिवसभर शोधाशोध, निकटवर्तीय चिंतेत, सिंगापूरला अचानक काय काम निघाले?


महापौर सुरेश पवार सिंगापूरला, कुणालाच पत्ता नाही!

लातूर: काल सकाळचं झेंडावंदन, नंतरची तिरंगा रॅली आटोपली की लातूरचे प्रथम नागरिक, विकास पुरुष महापौर सुरेश पवार कुठे गेले हे कुणालाही सांगता येईना. आज सुटीचा दिवस असला तरी वेगवेगळ्या कामानिमित्त त्यांना अनेकांना भेटायचं होतं, बोलायचं होतं पण ते काही शक्य होईना. ही बाब आमच्या कानावर आली, आम्ही तातडीने फोन केला. सगळ्या रिंग झाल्या पण त्यांनी फोन घेतला नाही. नंतर त्यांना माहित नसलेल्या फोनवरुन प्रयत्न केला पण तसेच झाले. आता करायचे काय? म्हणून बरीच फोनाफोनी केली तेव्हा महापौर सिंगापूरकडे रवाना झाल्याचे कळाले! महापौर कुठे असतील या चिंतेने त्यांचे सहकारी, सावलीसारखे सतत सोबत असणारे उप महापौर देवीदास काळेही असेच काळजीत पडले होते. त्यांच्याशी संपर्क केला तेव्हा महापौर सिंगापूरला गेल्याचे आमच्याकडूनच त्यांना कळाले! त्यांनी तातडीने फोन लावला तेव्हा तात्यांनी फोन घेतला आणि सिंगापूरला जातोय एवढेच सांगितले. पण अचानक सिंगापूर कसे काय? फॅमिली टूर तर नाही आणि सरकारी कार्यक्रम असता तर सगळ्यांनाच कळाले असते. पेपरात छापून आले असते या विचारातून अनेकजण धास्तावले. भाजपाचे सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाही काहीच माहिती नव्हती. महापौरांच्या सगळ्या निकटवर्तीयांशी बोलून झालं पण सगळीकडूनच आम्हाला माहित नाही हे उत्तर मिळालं. तोपर्यंत ही बाब विरोधकांच्या कानावर गेली. इकडे कर्मचार्‍यांच्या पगारी नाहीत, संक्रांत अंधारात गेली आणि महापौर सिंगापूरला कसे काय जातात असा प्रश्न त्यांनीच आम्हाला विचारला. मग आम्ही आयुक्त अच्युत हंगेंशी संपर्क साधला. ते जायचं म्हणत होते, त्यांना काही तरी पत्र आलंय म्हणे, पण कशाचं, काय कधी, कशासाठी हे काही माहित नाही असं त्यांनी सांगितलं. दरम्यान आमच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापौरांच्या परिषदेसाठी सुरेश पवार सिंगापूरला निघाले आहेत. २९ आणि ३० जानेवारी रोजी ही परिषद होईल, ती आटोपून महापौर दोन फेब्रुवारीला लातूरला परततील असे समजले. मात्र याला मनपाच्या प्रशासकीय सुत्रांकडून दुजोरा मिळू शकला नाही. प्रवक्ते शैलेश स्वामी यांच्याकडे विचारणा केली असता महापौर मुंबईला गेले आहेत असे त्यांनी सांगितले. शहराचा प्रथम पुरुष अशा पद्धतीने परदेशी जातो, कुणालाच त्याची नीट माहिती नसते याबद्दल खेद, चिंता व्यक्त केली जात आहे. आता महापौरांचा विरोधी गट कसा सक्रीय होतो याची प्रतिक्षा करीत आहोत!


Comments

Top