HOME   टॉप स्टोरी

आमदार अमित देशमुख यांनी घेतली अख्तर शेख यांची भेट

प्रकृतीची चौकशी, मैत्रीपूर्ण गप्पा, राजकारणाचा विषयही नाही!


आमदार अमित देशमुख यांनी घेतली अख्तर शेख यांची भेट

लातूर: आ. अमित देशमुख यांनी आज माजी महापौर अख्तर शेख मिस्त्री यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. प्रकृतीची आणि घडलेल्या घटनेची चौकशी केली. दोघात मैत्रीपूर्ण गप्पा झाल्या. राजकारणाचा कसलाही विषय या गप्पात नव्हता. आ. अमित देशमुख यांचे खंदे समर्थक समजले जाणारे अख्तर शेख मिस्त्री यांना कॉंग्रेसने महापौरपदाचीही संधी दिली होती. सध्या ते भाजपात आहेत. आपणास झालेल्या मारहाणीमागे वैयक्तिक भांडणाचे कारण होते. हे शेख यांनी वारंवार सांगूनही अनेकांनी त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला होता. झोपेतून उठल्यापासून झोप येईपर्यंत एका हातात व्हाट्सअ‍ॅप आणि दुसर्‍या हातात फेसबुक घेऊन बसणार्‍या ‘रिकामी पार्टी ऑफ इंडिया’च्या काही सदस्यांनी या मारहाणीचे होकायंत्र कॉंग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांकडे वळवले होते. पण कॉंग्रेसमधला कुणीही यामुळे विचलित झाला नव्हता. अख्तर मिस्त्री यांच्यावर २५ डिसेंबर रोजी साधरणत: १५ जणांनी हल्ला केला होता. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. आधी त्यांना पोद्दार रुग्णालयात भरती करण्यात आले होते. नंतर रक्तदाबाचा त्रास वाढल्याने दुसर्‍या दवाखान्यात हलविण्यात आले होते. या ठिकाणी आजलातूरने त्यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीतही आपणास झालेल्या मारहाणीमागे कसलेही राजकारण नाही. ही मारहाण वैयक्तिक भांडणातून झाली होती असे त्यांनी स्पष्ट केले होते. दूर राहून सोशल मिडियाच्या माध्यमातून लातुरात आग लावण्याचा प्रयत्न सुरु आहे हे लातुरकरांच्या लक्षात तेव्हाच आले होते. या प्रकरणात १४ जणांविरुध्द तक्रार देण्यात आली होती. त्यापैकी दोन आरोपी सापडले आहेत. बाकी १२ जण फरार आहेत. ही फरार मंडळी अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात आहे अशी माहिती अख्तर शेख यांनी दिली.


Comments

Top