HOME   टॉप स्टोरी

अखेर अष्टविनायक शाळेवर प्रशासक नियुक्त

मनपाच्या खुल्या जागेत बांधकाम करुन व्यावसायिक वापर केल्याचं प्रकरण


लातूर: लातुरच्या शिवाजीनगर भागातील अष्टविनायक शाळेला ०३ डिसेंबर २०१७ रोजी महानगरपालिकेने कुलूप घातले होते. महापालिकेच्या खुल्या जागेवर बांधकाम करुन व्यावसायिक वापर केल्याचे सिद्ध झाले होते. ही जागा ताब्यात घेण्याचे आदेशही देण्यात आले होते. या प्रकरणी नेमलेल्या समितीच्या अहवालावरुन या शाळेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. गट शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, चाकूर पंचायत समितीचे पंचगल्ले आणि देवणी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी उज्वल कुलकर्णी यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
या संदर्भात शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, मनपा हद्दीतील लातूर १८९ पैकी जागेतील लातूर इंडस्ट्रीयल इस्टेट को ऑपरेटीव सोसायटी लि. लातूर या मधील मंजूर रेखांकनातील खुल्या जागेत अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने अनधिकृत बांधकाम करुन शाळा सुरु केली. हा प्रकार अनुज्ञेय नाही. ही शाळा अनधिकृत बांधकाम केलेल्या जागेत सुरु आहे. ही जागा परत घेण्याबाबत मनपाकडून कारवाई सुरु आहे. या शाळेचे व्यवस्थापन ताब्यात घेऊन ०२ वर्षांसाठी प्रशासक नेमले जात आहेत. गट शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, चाकूर पंचायत समितीचे पंचगल्ले आणि देवणी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी उज्वल कुलकर्णी यांचा समावेश आहे.
शाळेला घातलेले कुलूप पालकांनी तोडले होते. मात्र रितसर परवानगी मिळेपर्यंत कार्यालयाचा ताबा घेणार नाही अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली होती. सगळे वर्ग झाडाखाली भरवण्यात आले होते. शाळेवर प्रशासक नेमले गेल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही आणि पुढील वर्षी हे विद्यार्थी इतर शाळात प्रवेश घेऊ शकतील. या सबंध प्रकरणाचा पाठपुरावा माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लीकार्जून भाईकट्टी यांनी केला होता.


Comments

Top