HOME   टॉप स्टोरी

एमआयटीच्या शोमध्ये अनेक विमानांचे उड्डाण, अफलातून शो

ज्ञान, तंत्रज्ञान शिकवण्याचा प्रयत्न, छोटी विमाने मोफत, रबरावर चालणार्‍या विमानाची विक्री


लातूर: विमानातील विज्ञान समजून देण्याच्या मुख्य उद्देशाने विश्‍वशांती गुरुकुलाच्या वतीने लातूर जिल्हातील विद्यार्थ्यांसाठी ‘एरोमॉडेलिंग शो’ विश्वशांती गुरुकुल, आर्वी-साई रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आला होता. या एरोमॉडेलिंग शोमध्ये एरोमॉडलर सदानंद काळे व पुणे, अहमदनगर, सातारा येथील अनुभवी निष्णात एरोमॉडेलर्सच्या संघाने प्रात्यक्षिके सादर केली. उपस्थित हजारोजणांनी अचंबित होऊन जोरदार प्रतिसाद दिला. विमानाचं तंत्र काय असतं, कोणत्या प्रकारची विमाने वापरली जातात, खेळण्यातली विमाने कशी तयार करायची कशी उडवायची याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी २५-३० प्रकारची विमाने प्रात्यक्षिकांसाठी आणली होती पण खराब वातावरणामुळे शो आवरता घ्यावा लागला. उपस्थित विद्यार्थ्यांना खेळण्यातल्या पण उडू शकणार्‍या थर्माकोलची विमाने भेटही देण्यात आली. कुठल्याही मैदानात उडवता येतील अशी रबराच्या लवचिकतेवर उडणारी विमाने विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. यावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, प्रदीप राठी, शंकर गुटे उपस्थित होते. या एरोमॉडेलिंग शोमध्ये लाकूड आणि थर्माकोलमधून बनविलेल्या लहान मोठ्या आणि विविध प्रकारच्या इलेक्ट्रीकल मोटर आणि इंजिनवर उडणार्‍या रेडिओ कंट्रोलने नियंत्रित करता येणार्‍या आकर्षक मॉडेल्सची प्रात्यक्षिके आणि हवाई कसरती शोच्या दाखवण्यात आल्या. ट्रेनर विमान, पक्षाप्रमाणे हवेत तरंगणारी ग्लायडर्स, उडती तबकडी, बॅनर टोईंग या शिवाय लूप रोल, स्पिन यासारखी थरारक लढावू विमानाच्या कसरती पाहायला मिळाल्या. सदानंद काळे यांच्या या टीमने आजवर भारभर अशा प्रकारचे ५०० शो केले आहेत. त्यांनी लहानपणी कचर्‍यातून उडणारं विमान तयार केलं होतं. विज्ञान प्रदर्शनात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ते स्वत: उडवून पाहिलं होतं.


Comments

Top