HOME   टॉप स्टोरी

लातुरातल्या बालविवाह प्रकरणी ११ जणांना ०२ दिवसांची कोठडी

काल आदर्श कॉलनीसमोर चालला दोन तास तमाशा, मारामारी आणि आरोप प्रत्यारोप


लातूर: बंजारा समाजातील अल्पवयीन मुलीचे मारवाडी समाजातील ३० वर्षीय तरुणासोबत विवाह लावून देण्याचा प्रकार फसल्यानंतर आज या सर्व ११ आरोपींना न्यायालयात उभे करण्यात आले. या सर्व आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. काल बंजारा समाजातील १६ वर्षे वयाच्या मुलीचा विवाह मारवाडी समाजातील ३० वर्षीय तरूणासोबत लावून दिल्याची घटना लातूर शहरातील आदर्श कॉलनी परिसरात उघडकीस आली. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीसांत नवरदेवासह ११ वर्‍हाडींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली. अल्पवयीन नवरीची रवानगी शासकीय सुधारगृहात करण्यात आली आहे. चाकूर तालुक्यातील बोधी तांडा येथील बंजारा समाजाच्या १६ वर्षीय मुलीचा विवाह लातुरातील मारवाडी समाजातील लक्ष्मीकांत रामविलास गौड (३०) या तरूणाशी शुक्रवारी (दि.२७) दुपारी गौड यांच्या घरी लावण्यात आला. याची माहिती मिळताच गोर सेना संघटनेचे लातूर जिल्हा सचिव सुनील आडे यांच्यासह अशोक चव्हाण, बब्रुवान पवार, बालाजी जाधव, संतोष राठोड, सतीष राठोड आदींनी औसा रोडवरील आदर्श कॉलनी कमानी समोरचे गौड यांचे घर गाठले. तेथे हा बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात उपस्थितांना जाब विचारण्यात आला असता त्यांनी आडे यांच्यासह सोबत आलेल्या तरूणांना मारहाण केली. पोलिसांनी वधू व अन्य लोकांना ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी धम्मानंद कांबळे, सीताराम कांबळे, अमर हत्तरगे, यांनी पोलीस ठाण्यात धाव घेवून अल्पवयीन मुलीला निरीक्षणगृहात पाठवण्याची प्रक्रिया पार पाडली. यासंदर्भात सुनील आडे यांनी शिवाजीनगर पोलीसांत दिलेल्या तक्रारीवरून नवरदेव लक्ष्मीकांत रामविलास गौड, सासरा रामविलास गौड, नवरदेवाचा भाऊ किशोर गौड, अंजना शिवाजी राठोड, शिवाजी धानसिंग राठोड, बालाजी वामन चव्हाण, सचिन वामन चव्हाण,सविता राजेंद्र राठोड, रंजना शिवाजी राठोड, धनाबाई वामन चव्हाण, देविदास रामचंद्र राठोड आदी ११ जणाविरूद्ध गुरनं ९७/१८ कलम ९, १०, ११ बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ व कलम ३२३, ५०४, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व आरोपींना आज न्यायालयात उभे करण्यात आले त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.


Comments

Top