HOME   लातूर न्यूज

मालमत्ता कर आकारणी अवास्तव आणि नियमबाहय

वसुली मोहिम राबवण्यापूर्वी विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी


मालमत्ता कर आकारणी अवास्तव आणि नियमबाहय

लातूर महानगरपालिकेने केलेली मालमत्ता कर आकारणी अवास्तव आणि नियमबाहयही आहे. त्यामुळे वसुली मोहिम राबवण्यापूर्वी या प्रकरणी ताबडतोब विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी व चर्चेअंती योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांनी, निवेदनाद्वारे महापौर सुरेश पवार यांच्याकडे केली आहे.
काँग्रेस नगरसेवकांनी महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लातूर शहर महानगरपालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ कलम १२७ अन्वये महानगरपालिकेच्या मालमत्तेवर कर बसविण्याचा ठराव महानगरपालिकेने केलेला नाही. तसेच कलम १२९ (२) अन्वये मालमत्ता कर बसविण्याची पध्दत स्विकारण्याचा ठराव कलम १९ अन्वये महानगरपालिकेत मंजूर केल्यानंतरच पुढील वर्षासाठी कर बसविता येतो. परंतू महानगरपालिका प्रशासनाने साल सन २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षासाठी लातूरच्या जनतेकडून करापोटी नोटीसा देऊन मागणी केली आहे. ती पूर्तता बेकायदेशीर व नियमबाहय असून कलम ९९ प्रमाणे महानगरपालिकेने त्यासंबंधीचा ठराव मंजूर केलेला नाही. यामुळे महानगरपालिकेने ठराव मंजूर केल्याशिवाय नागरिकांकडून परस्पर कराची मागणी जी केलेली आहे ती लातूरच्या नागरिकांवर अन्यायकारक आहे.
सन २०१७-१८ व सन २०१८-१९ यावर्षासाठी कर मागणीच्या दिलेल्या नोटीसी ताबडतोब रद्द कराव्यात व लातूरच्या जनतेला जाचक करातून मुक्त करावे, वसुली मोहिम राबवण्यापूर्वी लातूरकरांच्या जिव्हाळयाचा प्रश्नावर आपण ताबडतोब विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
या निवेदनावर विरोधी पक्षनेता दिपक सुळ, अशोक गोविंदपूरकर, चाँदपाशा घावटी, विक्रांत गोजमगुंडे, कैलास कांबळे, रविशंकर जाधव, ओमप्रकाश पडिले, अहेमदखान पठाण, सपना किसवे, सचिन बंडापल्ले, इम्रान सय्यद, विजयकुमार साबदे, गौरव काथवटे, युनुस मोमिन, आयुब मणियार, बाळासाहेब देशमुख, सचिन मस्के, रेहना बासले, पुनित पाटील, मिना लोखंडे, पुजा पंचाक्षरी, रुबीना तांबोळी, कांचना अजनीकर, कालिंदा भगत, उर्मिला बरुरे, योजना कामेगावकर, उषा भडीकर, वर्षा मस्के, सोजर मदने, हारुबाई बोईनवाड,गोरीबी बागवान, रफतबी शेख,फरजाना बागवान, कमल सोमंवशी, दिप्ती खंडागळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Comments

Top