logo

HOME   लातूर न्यूज

स्वच्छता पुरस्काराचे सामूहिक: काँग्रेस

मनपात श्रेयवादाची लढाई, राष्ट्रीय पुरस्कारामुळे सगळेच आगतिक

स्वच्छता पुरस्काराचे सामूहिक: काँग्रेस

लातूर: लातूर शहर महानगरपालिकेस मिळालेल्या राष्ट्रीय पातळीवरही स्वच्छता पुरस्काराचे श्रेय कोणा एका व्यक्ती वा राजकीय पक्षाचे नसून ते सामूहिक असल्याचा दावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी केला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की, शहर मनपास मिळालेल्या स्वच्छता पुरस्काराचे श्रेय लाटण्याची स्पर्धाच जणू सध्या सत्ताधारी भाजपमध्ये लागली असल्याचे निदर्शनास येत आहे. परंतु शहराच्या स्वच्छतेच्या कामी परिश्रम घेणारे काँग्रेससह सत्ताधारी पक्षाचे सर्व नगरसेवक, मनपा प्रशासन, घंटागाडीवरील स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था या सर्वांचे हे सामूहिक यश आहे. लातूर शहर मनपाचे तत्कालीन आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर यांनी यासाठी केलेले प्रयत्न अतुलनिय असे राहिले आहेत. तसेच त्यांना मनपाच्या सहायक आयुक्त वसुधा व त्यांच्या सहकाऱ्यांची विशेष साथ मिळाल्याने हे घडू शकले. सेवाभावी संस्थांनी केलेले शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभिकरणही याकामी मोलाचे ठरले आहे. तत्कालीन आयुक्त कौस्तुभ दिवेगांवकर त्यांच्या प्रयत्नांशिवाय लातूर मनपा पुरस्कारापर्यँत पोहचूच शकली नसती. त्यामुळे याकामी त्यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व नगरसेवक विशेष अभिनंदन करत आहेत. सामूहिक यशाचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नगरसेवकांनी आजतागायत कधीही केला नाही व यापुढेही करणार नाही, असे नमूद करून याकामी परिश्रम घेणाऱ्या सर्व मनपा पदाधिकारी, प्रशासनातील संबंधित अधिकारी व स्वच्छता कर्मचारी, घंटागाडीवर काम करणारे कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचेही भारतीय काँग्रेसचे नगरसेवक अभिनंदन करतात ,असे म्हटले आहे. या प्रसिद्धिपत्रकावर काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, अहमदखान पठाण, विजयकुमार साबदे, विरोधी पक्षनेता दीपक सूळ, इमरान सय्यद, सपना किसवे यांसह काँग्रेस नगरसेवकांची नावे आहेत.


Comments

Top