HOME   लातूर न्यूज

आयएमएच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आयएमए लातूर शाखेच्या वतीने 'एक धाव आरोग्यासाठी' हे ब्रीद वाक्य

आयएमएच्या वतीने आयोजित  मॅरेथॉन स्पर्धेस  उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर: आयएमए लातूर शाखेच्या वतीने ' एक धाव आरोग्यासाठी' हे
ब्रीद वाक्य घेऊन रविवार, ०२ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित
करण्यात आलेल्या 'सनरीच आयमेथॉन २०२० - लाईफसेव्हर्स रन ' मॅरेथॉन
स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री
संजय बनसोडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेचा थाटात
शुभारंभ करण्यात आला. रविवारी सकाळच्या बोचऱ्या थंडीत हजारोंच्या
संख्येने स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते.
या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी प्राचार्य अनिरुद्ध जाधव, महापौर
विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक डॉ.
राजेंद्र माने, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अजय जाधव, सचिव डॉ. संतोष डोपे, डॉ. वैशाली चपळगांवकर, डॉ. चांद पटेल, डॉ. आरती झंवर, डॉ. ज्योती पाटील, डॉ. कल्पना किणीकर, डॉ. कांचन जाधव , डॉ. सेलूकर, डॉ. अय्याज आदी मान्यवरांची उपस्थिती होती. औसा रोड वरील कस्तुराई मंगल कार्यालयापासून या मॅरेथॉन स्पर्धेस प्रारंभ झाला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी अशा
प्रकारच्या स्पर्धांच्या आयोजनाने तरुणाईमध्ये उत्साह संचारण्यास मदत
होते आणि ते शारीरिक तंदुरुस्तीचे दृष्टीने जागरूक होऊ शकतात असे
सांगितले. आजच्या धावपळीच्या दिवसात प्रत्येकाचे आपल्या आरोग्याकडे
दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे लातूर आयएमएच्या वतीने ह्या मॅरेथॉन
स्पर्धेचे आयोजन केले जाणे लातूरकरांसाठी एक पर्वणीच असल्याचे सांगून
सर्वांना शुभेच्छा दिल्या. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आपले विचार
व्यक्त करताना आयएमएच्या तज्ज्ञ डॉक्टर्सनी तमाम लातूरकरांच्या
स्वास्थाच्या दृष्टीने एक चांगली स्पर्धा आयोजित केली असून अशा
प्रकारच्या उपक्रमांना लातूर शहर मनपा नेहमीच सहकार्य करेल,असे सांगितले.
प्राचार्य अनिरुध्द जाधव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.
गिरीश ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त करून स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयएमएच्या सर्व
पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ही मॅरेथॉन स्पर्धा ३ किमी., ५ किमी. व १० किमी. अंतर गटात घेण्यात आली.स्पर्धेच्या समारोपानंतर लगेचच विविध वयोगटातील सुमारे १०० विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. पारितोषिक वितरण सोहळा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, आरोग्य उपसंचालक डॉ. माले, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे , डॉ. बाहेती, डॉ. आरदवाड , डॉ. सूर्यकांत निसाले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठीआयएमएच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
-----------------------


Comments

Top