HOME   व्हिडिओ न्यूज

खाजगी शिकवण्यांवर धाडी, जीएसटीचे पथकही हजर

हे तर रुटीन चेकअप! शिकवणी चालकांचा दावा, पालकांची गर्दी


लातूर: जीएसटी आणि आयकर विभागाने लातुरच्या खाजगी शिकवण्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. काल रात्रीपासूनच जीएसटीचे पथक या भागात दाखल झाले असून आज त्यात आयकर विभागाच्या पथकाचीही भर पडली. या पथकांनी क्लासेसच्या व्यवहारांची तपासणी सुरु केली. काही नवीन क्लासेस कर चुकवित असल्याचा या विभागांना संशय आहे. या धाडी नसून नियमित तपासणी आहे असा दावा क्ज्लासेसचालक करतात. या पथकांच्या गाड्या बाहेर जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या दिमतीला आलेले पोलिसही खाजगी गाड्यातूनच दाखल झाले आहेत. या प्रकारची कुणकुण लागताच अनेक क्लासेससमोर पालकांनीही गर्दी केली होती. काही क्लासचालक कॅमेरे चुकवून आपापल्या गाड्यातून पसार झाले. खाजगी शिकवण्यांच्या या परिसरात प्रचंड शांतता होती. गोपनीयताही पाळली जात होती. कुणीही स्पष्टपणे बोलण्यास तयार नव्हते. काही क्लासचालकांनी दारे बंद करुन घेतली होती, काहींनी अर्धे शटर लावले होते.
दरम्यान अशाच धाडी नांदेड आणि औरंगाबादेतही सुरु होत्या. खाजगी शिकवण्यांसाठी लातूर हे मोठे केंद्र मानले जाते. अनेक विद्यार्थी आपापल्या गावच्या महाविद्यालयात नाममात्र प्रवेश घेतात आणि दिवसभर लातुरात शिकवण्यांतून ज्ञान साधना करीत असतात. मराठवाड्यातील अनेक शहरांमधून नीट, मेडिकल, सीईटी आणि इतर परिक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी लातुरात येतात. या विद्यार्थ्यांकडून आकारले जाणारे शुल्कही भरभक्कम असते. अनेक क्लासचालक वेगवेगळ्या सवलतीही देत असतात. क्लासेसमुळे वर्तमानपत्रांनाही पानपान भरुन जाहिराती मिळत असतात.


Comments

Top