HOME   महत्वाच्या घडामोडी

पद्माळेकरांच्या पाठीशी लातूरकर ठामपणे उभे

पूरग्रस्त भागाला पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी दिली भेट

पद्माळेकरांच्या पाठीशी लातूरकर ठामपणे उभे

सांगली: संकटाच्या काळात सांगलीकरांनी लातूरला ट्रेनव्दारे पाणीपुरवठा करून फार मोठी मदत केली आहे. लातूरकर सांगलीकरांचे ऋणी आहेत. सांगलीकरांशी आमचे भावनिक नाते आहे. त्यामुळे एक लातूरकर म्हणून मी येथे आलो आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पद्माळे गावची जबाबदारी लातूरकरांनी घेतली आहे. लातूरचा शैक्षणिक पॅटर्न आदर्शवत आहे. पद्माळे गावातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण देण्याची सर्वतोपरी जबाबदारी लातूरकरांनी घेतली आहे. पद्माळे गावाच्या पाठीशी लातूरकर ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले.
मिरज तालुक्यातील पूरग्रस्त पद्माळे या गावाला भेट देवून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास व उद्योजकता, भुकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, तहसिलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ, सरपंच सचिन जगदाळे, ग्रामस्थ उपस्थित होते. संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले, पुरामुळे पद्माळे गावचे शेती, घरांचे, शाळा, प्रापंचिक साहित्याचे फार मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना शासन सर्वतोपरी मदत करत आहे. पुरामुळे पद्माळे गाव दहा वर्षे मागे पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे नुकसान, व्यवसायाचे नुकसान कशा प्रकारे सुधारता येईल, पद्माळे गाव पुन्हा नव्या उमदीने व जोमाने उभे करण्यासाठी व लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असून लातूर प्रशासनातील अधिकारी यांना पद्माळे गावास भेट देवून लोकांशी संवाद साधून सर्व्हे करण्यासाठी निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लातूरचा शैक्षणिक पॅटर्न आदर्शवत असून एक वेगळा एज्युकेशन हब करण्यासाठी प्रयत्नशील राहू. आरोग्य, कौटुंबिक गरजा, शाळेच्या पुनर्बांधणीसाठीही आवश्यक ती मदत केली जाईल. शासना व्यतिरिक्त लातूरकरांच्या वतीने एकमेकांशी संवाद साधून, तंत्रज्ञानाचा वापर करून आवश्यक कामे 1 वर्षात पूर्ण करू. झालेल्या कामाबद्दल संवाद व चर्चा करण्यासाठी पुन्हा पद्माळे गावास भेट देवू, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. ग्रामपंचायत पद्माळे येथे बैठक घेवून पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेवून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पद्माळे गावातील पडझड झालेल्या घरांची, शाळेची पाहणी करून ग्रामस्थांना धीर दिला. सरपंच सचिन जगदाळे यांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली.


Comments

Top