HOME   महत्वाच्या घडामोडी

सहानुभुतीचे नव्हे तर विकासाचे राजकारण करतो

संकल्प मेळाव्यात पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे प्रतिपादन

सहानुभुतीचे नव्हे तर विकासाचे राजकारण करतो

लातूर: सबका साथ, सबका विकास या धोरणानुसार केंद्र व राज्य सरकारने गत पाच वर्षात केवळ आणि केवळ विकासाचेच राजकारण केलेले असून या पाच वर्षात लातूरच्या आमदारांनी काय केले याची माहिती जनतेला द्यावी असे आव्हान देवून पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सहानूभूतीचा चेक केवळ एकदा वटत असतो असा टोला लगावत आम्ही सहानुभूतीचे नव्हे तर विकासाचे राजकारण करतो आणि लातूरची विकास प्रिय जनता विकासाला साथ देईल असा विश्‍वास व्यक्त केला.
लातूर विधानसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर बिडवे लॉन्स येथे झालेल्या भाजप पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, मंडळ प्रमुख व लोकप्रतिनिधींच्या विजयी संकल्प मेळाव्यात पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी महापौर सुरेश पवार,उपमहापौर देविदास काळे रिपाइचे चंद्रकांत चिकटे, मनपा स्थायी सभापती,माजी सभापती शैलेश गोजामगुंडे, महिला आघाडीच्या स्मिताताई परचुरे, लातूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शैलेश लाहोटी, भाजपचे नगरसेवक यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री निलंगेकर म्हणाले की, आम्ही विकासकामे करत असल्याने उगाच लावरे तो व्हिडिओ असे म्हणणार नाही लातूरच्या विकासात लातूरला रेलवे बोगी प्रकल्प आणला त्यात चाळीस हजार स्थनिकांना रोजगार मिळणार आहे असे सांगून येथील काँग्रेस चे आमदार माझा अर्धवट विडिओ दाखवून समाधान मानत असल्याचे ऐकण्यात येत आहे. लातूरला महाराष्ट्रातील एकमेव बोगी प्रकल्प आणून याची उभारणी होत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामे शहरात होत असून महापालिका निवडणुकी दरम्यान दिलेल्या काही वचनांची पुर्तताही आम्ही केली आहे असे पालकमंत्री निलंगेकर यांनी स्पष्ट केले. या विकास कामांच्या जोरावरच आम्ही निवडणूकीला सामोरे जात आहोत. मात्र विरोधक पुन्हा एकदा सहानुभूतीचे राजकारण करू लागलेले असून एखाद्याच्या सहनुभूतीवर कितीदा मातेे मागायची असा प्रश्‍नही पालकमंत्री निलंगेकरांनी यावेळी उपस्थित केला. आता लातूरकारानी ठरवलंय लातुरात भाजपचा आमदार निवडून द्यायचा यासाठी काँग्रेसची काही मंडळी कामाला लागल्याचा गौप्यस्फोट पालकमंत्र्यांनी केला. यावेळी ते पुढे म्हणाले की गोरे इंग्रज घालवले मात्र काँग्रेसच्या रूपाने काळे इंग्रज समाजात सतत गैरसमज, संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. याकडे दुर्लक्ष करीत भाजप कार्यकर्त्यानी अशा विचारला थारा न देता भाजपच्या विजयासाठी आगामी बारा दिवस प्रयत्न करावेत. असे आवाहन करून जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. आगामी दोन वर्षात उजनीच्या पाणी लातुरात आणू तसे न घडल्यास मी राजकारणात कोणत्याही पदावर असू त्याचा राजीनामा देईन असा पुनरुचार करून विरोधकांच्या उजनीच्या पाण्याबाबतच्या प्रश्‍नाला सडेतोड उत्तर दिले.
यावेळी रासपचे करपे, रिपाइंचे चिकटे यांनी कमळसमोरील बटन दाबून भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले. प्रास्तविक शैलेश गोजमगुंडे यांनी केले तर आभार तुकाराम गोरे यांनी मानले. गोलाईतील देवीचा आशिर्वाद घेतल्यानंतर पालकमंत्री निलंगेकर व शैलेश लाहोटी यांच्या नेतृत्वात शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीचे ठिकठिकाणी मतदारांनी व कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव करत रॅलीचे स्वागत केले.


Comments

Top