HOME   महत्वाच्या घडामोडी

वंचित बहुजन आघाडी चांगला पर्याय

ज्येष्ठ सामाजिक नेते मनोहरराव गोमारे यांचा आघाडीला पाठिंबा

वंचित बहुजन आघाडी चांगला पर्याय

लातूर: आजघडीला राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजपा-शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांना समर्थ आणि चांगला पर्याय म्हणून प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी पुढे आली आहे. त्यामुळे आपण वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा देत असल्याची माहिती ज्येष्ठ समाजवादी नेते मनोहरराव गोमारे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवदास लखादिवे, वंचित बहुजन आघाडीचे लातूर शहर विधानसभेचे उमेदवार राजा मणियार, लातूर ग्रामीणचे उमेदवार मंचकराव डोणे, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सूर्यवंशी, अशोक उपासे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना अ‍ॅड. गोमारे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, विद्यमान महायुती सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर भाजप-शिवसेना हे राजकीय पक्ष नसून विशिष्ट जाती धर्माच्या संघटना असल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस आघाडी तसेच विद्यमान महायुतीच्या सत्ता काळातही सर्वसामान्य जनतेला आर्थिक, सामाजिक व राजकीय न्याय मिळाला नाही. समाजातील दलित ,भटके विमुक्त, मागासवर्गीय, दुर्बल शोषित समाज घटकांना स्वावलंबी होऊन सन्मानाने जगण्याची संधी मिळण्यासाठी वंचित समाज घटकांच्या हाती सत्ता असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या वंचित बहुजन आघाडी एक चांगला राजकीय पर्याय म्हणून पुढे आली आहे. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला विजयी करून पुरोगामी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात लातूर जिल्ह्याचा फार विकास झाल्याचे सांगितले जात असले तरी ते धादांत खोटे असल्याचे गोमारे म्हणाले. घराणेशाहीला पोषक ठरू पाहणारे राजकारण समाजाच्या हिताचे नाही. त्यामुळे या निवडणुकीत आपण व आपले समविचारी सहकारी मित्र वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठींबा देत आहोत,असे गोमारे यांनी सांगितले. मतदारांनी लातूर शहर मतदार संघाचे उमेदवार राजा मणियार, लातूर ग्रामीणचे उमेदवार मंचकराव डोणे यांना तसेच जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहनही मनोहरराव गोमारे यांनी केले.


Comments

Top