HOME   महत्वाच्या घडामोडी

भय्यू महाराजांनी आत्महत्या का केली? कोडे उलगडेना

तणावामुळे आत्महत्या लिहिले चिठ्ठीत, सीबीआय चौकशीची कॉंग्रेसची मागणी

भय्यू महाराजांनी आत्महत्या का केली? कोडे उलगडेना

इंदौर: अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज अर्थात उदयसिंह देशमुख यांच्या आत्महत्येमुळं समाजमन ढवळून निघालं आहे. सर्वांना सबुरी आणि संयमाचा सल्ला देत अडचणीत मार्ग दाखवणारे भय्यू महाराज असं काही करतील हा धक्का सर्वांना बसला आहे. त्यांनी आपण तणावात आहोत, कंटाळलो आहोत असं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. सबंध देशभरात बड्या व्यक्तींशी, सर्व पक्षातील राजकारण्यांशी सलोख्याचे संबंध असणार्‍या भय्यू महाराजांवर तणाव कसा असू शकतो? त्यांना आर्थिक विवंचना कशी असू शकते? असाही प्रश्न चर्चिला जात आहे. प्रचंड कर्ज आणि दिवाळखोरी यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे असंही बोललं जात आहे.
भय्युजी महाराज यांच्या आश्रमात सर्व क्षेत्रातील दिग्गज येत असत. ते सर्वांचं स्माधान करायचे. अण्णा हजारेंच्या उपोषणातही त्यांनी यशस्वी मध्यस्थी केली होती. या शिवाय स्वच्छता मोहिमेपासून त्यांनी अनेक सामाजिक कामात विधायक काम केले होते. आदिवासी मुलांसाठी शाळा, वेश्येंच्या मुलांसाठी शाळा अशा अनेक सामाजिक कामांचे श्रेय त्यांच्या नावावर आहे. त्यांनी दुपारी स्वत:वर गोळी झाडून घेतली तेव्हा घरी पत्नी, आई, स्वयंपाकी आणि नोकरही होते. दार तोडून त्यांना बाहेर काढावं लागलं. रुग्णालयात जाईपर्यंत त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता.
भय्युजी महाराज यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीत रस होता. अलिकडे त्यांनी राजकारणातला सहभाग आणि राबताही कमी केला होता. वर्षभरापूर्वी त्यांनी दुसरा विवाह केला होता. त्यांना मध्यप्रदेश सरकारने राज्यमंत्रीपद देऊ केलं होतं. ते त्यांनी नाकारलं होतं. त्यांचे आणि लोकनेते विलासराव देशमुख यांचे चांगले संबंध होते. भय्युजी महाराज यांच्यावर भाजपाने बरीच कामे सोपवली होती. ती पूर्ण करून घेण्यासाठी सारखा पाठपुरावा केला जात होता. त्याचमुळे भय्युजी महाराज तणावात होते असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.


Comments

Top